पुरंदर रिपोर्टर Live
सासवड : प्रतिनिधी
सावकारी जाचाला कंटाळून भिवरी (ता. पुरंदर) येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांवर सासवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर नारायण लोणकर (वय-54, रा. भिवरी, ता. पुरंदर) असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर विशाल दादासाहेब कामठे, दादासाहेब कामठे (दोघे रा. येवलेवाडी, पुणे) आणि जालिंदर निंबाळकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी लोणकर यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर लोणकर यांची भिवरी ग्रामपंचायत हद्दीत शेती आहे. 561 हा त्यांच्या शेतीचा गट क्रमांक असून एप्रिल 2024 मध्ये त्या गटातील 5 गुंठे जमीन विक्रीसाठी काढली होती. निंबाळकर यांच्या ओळखीने विशाल कामठे आणि दादासाहेब कामठे यांनी ही जमीन 17 लाख 50 हजार रुपयांना विकत घेण्याचे ठरवले, सुरुवातीला 9 लाख रुपये इसारपोटी दिले. मात्र, उर्वरित 13 लाख रुपये देण्यास टाळाटाळ करीत होते.
यावेळी लोणकर यांनी इसार पावती रद्द करण्याची मागणी केली होती. यावेळी वरील तिघांनी 9 लाख रुपयांवर 4 लाख 50 हजार रुपये व्याज मागितले. लोणकर यांनी हे व्याज दिले, तरीही त्यांनी इसार पावती रद्द केली नाही. उलट जास्त व्याजापोटी आणखी 4 लाख रुपये मागितले आणि न दिल्यास 16 गुंठे शेतजमिनीवर ताबा घेण्याची धमकी दिली.
दरम्यान, विशाल कामठे, दादासाहेब कामठे आणि निंबाळकर यांनी शनिवारी (ता. 26) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लोणकर यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली व 4 लाख रुपये व्याजाची मागणी केली. तसेच, 16 गुंठे जमीन आपल्या नावावर करून देण्यास सांगितले. मागणी पूर्ण न झाल्यास हातपाय तोडण्याची आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून लोणकर यांनी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, लोणकर यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.
0 Comments