Malegaon Election Result 2025: पहाटे पाच वाजता माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी पुन्हा सुरु, आतापर्यंत किती जागांचा निकाल लागला?



माळेगांव कारखाना निकाल–

        संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे. मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी (Vote Counting) पूर्ण झाली असून आज दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीचा कल पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पॅनलला यश मिळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या 16 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत. 


                                यामध्ये अत्यंत चुरशीच्या सांगवी गटामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजीत खलाटे हे उमेदवार आघाडीवर आहेत तर बारामती गटामधून अजित पवार गटाचे देविदास गावडे हे आघाडीवर आहेत. याशिवाय तावरे गटाचे उमेदवार जीबी गावडे हेदेखील आघाडीवर आहेत. महिला गटामधून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर आहेत. तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे पाच वाजता सुरु करण्यात आली असून या कारखान्याच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम निकाल काय लागणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. 


                      अजित पवार हे सध्या उपमुख्यमंत्री असून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हाती आहे. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी या कारखान्याला 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. याचा प्रभाव मतदारांवर पडण्याची शक्यता होती. याशिवाय, अजित पवार हे सध्या सत्ताधारी असल्याने मतदारांचा कल त्यांच्या बाजूला जास्त असू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. त्यामुळे अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 पैकी किती जागा जिंकणार, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. आतापर्यंतची परिस्थिती पाहता अजित पवार यांच्या पॅनलला मोठे यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत.


Malegaon karkhana Election Result: माळेगाव कारखाना निवडणुकीत क्रॉस व्होटिंग

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याची बाब कालच्या मतमोजणीतून समोर आली होती. माळेगाव, सांगवी, पणदरे गटात क्रॉस वोटिंग झाले होते. क्रॉस वोटिंगचा फटका नेमका कोणाला बसणार, हे बघावे लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात ब वर्ग गटातून विजयी झाले होते.


माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळिराजा सहकार बचाव पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, अशी चार पॅनेल रिंगणात होती.

Post a Comment

0 Comments