बारामती | प्रतिनिधी
बारामती शहरात सोन्याच्या दागिन्यांच्या नावाखाली २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खोदकाम करताना सोन्याच्या वस्तू सापडल्याची बतावणी करत आरोपींनी प्रथम खरा सोन्याचा मणी दाखवून व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर १ किलो ४०० ग्रॅम वजनाचा बनावट सोन्याचा हार देत २५ लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाले.
या प्रकरणी बुरुड गल्ली, बारामती येथील उमेश अशोक दवे (वय ४२) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजस्थानमधील राजुभाई प्रजापती, त्याची पत्नी आणि दिनेशभाई प्रजापती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दवे यांचे नेवसे रोड येथे श्रीकृष्ण ऑटोमोबाईल नावाचे दुचाकी स्पेअर पार्ट व दुरुस्तीचे दुकान आहे. २६ सप्टेंबर रोजी राजुभाई प्रजापती मोटारसायकलच्या सर्व्हिसिंगसाठी दुकानात आला होता. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी त्याने काही जुनी नाणी दाखवत कोल्हापूर येथे जेसीबीने खोदकाम करताना सोन्याच्या वस्तू सापडल्याचे सांगितले.
विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सोन्याच्या मण्यांपैकी एक मणी दवे यांना दिला. ओळखीच्या सोनाराकडून तपासणी केली असता तो खरा असल्याचे समोर आल्याने दवे यांचा विश्वास बसला. त्यानंतर २५ लाख रुपयांना सोन्याच्या वस्तूंचा व्यवहार ठरला.
६ ऑक्टोबर रोजी आरोपी राजुभाई आणि त्याचा भाऊ दिनेशभाई दुकानात आले. मित्राच्या मध्यस्थीने दवे यांनी २५ लाख रुपये रोख आरोपींच्या ताब्यात दिले. बदल्यात आरोपींनी मण्यांचा हार असलेली पिशवी दिली आणि तेथून निघून गेले.
मात्र, संपूर्ण हाराची सोनाराकडून तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याऐवजी पितळेचा मुलामा आणि तांब्याचा आतील भाग असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींचे मोबाईल फोन बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे दवे यांच्या लक्षात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर करीत आहेत.

0 Comments