सोमेश्वरनगर | प्रतिनिधी
निरा–मोरगाव राज्य मार्गावर शनिवारी सायंकाळी दि. ६ जुन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास गुळुंचे गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर, सोमेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर आयशर टेम्पो (क्र. DD-01-G-9343) आणि इलेक्ट्रिक स्कुटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की स्कुटीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला तब्बल दीडशे फूट फरपटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या अपघातात स्कुटीवरील दोन तरुणींना डोके, हात व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे भीषण स्वरूप पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही हळहळ व्यक्त करत होते. जखमी झालेल्या एका लहान मुलाला ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर आयशर टेम्पो चालक वाहनासह पसार होण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, सतर्क ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
वृत्त लिहिपर्यंत मृत तरुणींची ओळख पटलेली नव्हती. दरम्यान, अपघात घडलेल्या ठिकाणी अनेक वर्षांपासून स्पीड ब्रेकर उभारण्याची ग्रामस्थांची मागणी प्रलंबित आहे. गेल्या काही वर्षांत याच ठिकाणी चार ते पाच गंभीर अपघात घडले असून अनेक जण जखमी झाले आहेत, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
*"स्पीड ब्रेकरच्या मागणीकडे दुर्लक्ष; दोन निष्पाप जीवांचा बळी"*
अपघातग्रस्त ठिकाणी वारंवार अपघात होत असूनही सुरक्षिततेच्या उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.


0 Comments