फलटण ।जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या सिद्धाली शहा यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान.


पुरंदर रिपोर्टर  Live 

फलटण  सुनील नरुटे.   

           फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांची ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका’ म्हणून नोंद झाल्याबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. बारामती येथील ‘सहयोग’ निवासस्थानी हा सत्कार सोहळा पार पडला.

           कु. सिद्धाली शहा यांनी अवघ्या २१ वर्षे १० महिने ५ दिवसांच्या वयात नगरसेविका म्हणून जबाबदारी स्वीकारून हा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. २१ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या नावाची ही नोंद झाल्याचे उपलब्ध माहितीनुसार नमूद करण्यात आले आहे. 

          यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सिद्धाली शहा यांच्याशी संवाद साधत त्यांच्या राजकीय तसेच सामाजिक कार्याची माहिती जाणून घेतली. अत्यंत कमी वयात लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारून सामाजिक क्षेत्रात काम करत जागतिक पातळीवर नोंद झाल्याबद्दल त्यांनी सिद्धाली शहा यांचे कौतुक केले.


महिला सक्षमीकरणासाठी तळागाळात काम करा  

महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना सुनेत्रा पवार यांनी फलटण शहरातील महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. महिलांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महिला विकासासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून, महिलांच्या प्रश्नांवर काम करताना लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

सिद्धाली शहा यांच्या जागतिक विक्रमाची यापूर्वीही विविध मान्यवरांनी दखल घेतली असून, त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालेला हा सन्मान आणि मिळालेले मार्गदर्शन यामुळे सिद्धाली शहा यांच्या सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, आगामी काळात महिला सक्षमीकरणासह सामाजिक क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करण्याचा त्यांचा मानस आहे.

Post a Comment

0 Comments