बारामती । निंबूतमध्ये ‘खेळ पैठणीचा’सोबत मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात; श्रीमंत राजहंस तरुण मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम;


पुरंदर रिपोर्टर Live

सोमेश्वरनगर : रमेश कदम

            महिलांच्या कलागुणांना, आत्मविश्वासाला आणि मनोरंजनाला वाव मिळावा, तसेच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे . नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा या उद्देशाने श्रीमंत राजहंस तरुण मित्र मंडळ, जगतापवस्ती–निंबूत यांच्या वतीने महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम तसेच एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. दोन्ही उपक्रमांना पंचक्रोशीतील नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध खेळांमध्ये आपले कौशल्य दाखविले. या स्पर्धेत शीतल निकम यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणी व सोन्याची नथ मिळवली. ही बक्षिसे अभिजीत ज्वेलर्स यांच्या सहकार्याने देण्यात आली. तसेच आळंदीकर सराफ व पायल ट्रेनिंग कंपनी अँड किराणा यांच्या सहकार्याने द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास सोन्याची नथ, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास चांदीचा छल्ला देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर धुमाळ व दिप्ती साळुंखे यांनी केले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला आनंदी व उत्साहपूर्ण वातावरण लाभले.



दरम्यान, आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात एकूण १५० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली, तर ६० गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.

या दोन्ही उपक्रमांना युगेंद्रदादा पवार युथ फाऊंडेशन, उद्योजक धैर्यशील काकडे, धनंजय संकपाळ व मंगेश ढमाळ यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments