पुरंदर प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे गुरुवारी (दि. १९) सकाळी एका ४९ वर्षीय शिक्षिकेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उज्वला रामदास काकडे (वय ४९) असे मृत शिक्षिकेचे नाव असून, त्या पांगारे येथील साधना शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. कामावर जाण्यासाठी बसस्थानकाकडे जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दगड आणि लोखंडी दांडक्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उज्वला काकडे या नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी बसस्थानकाच्या दिशेने जात होत्या. याचवेळी अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक दगड आणि लोखंडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे पांगारे गावासह संपूर्ण पुरंदर तालुक्यात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, हल्लेखोराची ओळख पटविणे आणि त्याला ताब्यात घेणे हे सासवड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांकडून विविध शक्यतांच्या अनुषंगाने तपास सुरू असून, या घटनेचा छडा लावून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
*

0 Comments