फलटण। मुख्याध्यापाकांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा जलसमाधी घेऊ ! पाडेगाव येथील वीर योद्धा प्रतिष्ठानचा आंदोलनाचा इशारा.



पुरंदर रिपोर्टर Live

लोणंद सुनील नरुटे 

           जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडेगाव फार्म ता. फलटण येथील मुख्याध्यापकांविरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम ३२ व ३३ अन्वये नोंदविण्यात आलेले गुन्हे तार्किकदृष्ट्या अयोग्य असल्याने तातडीने मागे घ्यावेत अन्यथा १ ऑक्टोबर २०२६ रोजी जलसमाधी घेऊ असा निर्वाणीचा इशारा पाडेगाव (ता. फलटण) येथील वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वन विभागाला देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन संस्थापक अध्यक्ष अमित (बापू) ढावरे यांनी संबंधित विभागांना दिले आहे. दरम्यान, प्राथमिक शाळेसाठी प्रतिष्ठानमार्फत घेतलेल्या या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

वन विभागाच्या जागेत अतिक्रमण केल्यावर वन विभागाने शाळा हटविण्याची नोटीस दिली होती त्यानंतर पाडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती जाधव व न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक केंजळे यांच्यावर वनक्षेत्रपाल कार्यालयाने गुन्हे नोंद केले. वास्तविक शाळेचे बांधकाम जवाहर रोजगार हमी योजनेतून झाले असून शाळा ही सार्वजनिक सुविधा असताना वन विभागाने गुन्हे नोंद केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वास्तविक शाळेची स्थापना सन १९३६ सालची असून शाळा बांधकाम करणारे आज हयात नाहीत. त्यामुळे हे गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी पाडेगाव ग्रामस्थांकडून केली जात आहे. नीरा (ता. पुरंदर) येथील सामाजिक कार्यकर्ते टी.के. जगताप, अमोल साबळे व इतरांनी वन विभागाच्या कारवाईवर आक्षेप घेतला असून निरेकर देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

विशेष म्हणजे वनपालांनी शाळेच्या मुख्याध्यापकांचे जबाब स्वतः टाईप करून आणले. त्यावर घाई गडबडीत सह्या घेतल्या त्यामुळे या बेकायदेशीर वर्तनाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. मुख्याध्यापक यांचा जबाब स्वतःच्या मर्जीने टाईप करून त्यावर सह्या घेणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रथम गुन्हे नोंद करण्याची मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.

“संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व अभिलेखाधारित फेरतपासणी करून, मुख्याध्यापक मुख्याध्यापिकेने कोणतेही वैयक्तिक अतिक्रमण किंवा भारतीय वन अधिनियमातील दंडनीय कृत्य केलेले नसल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्याविरुद्ध नोंदविलेला गुन्हा/कार्यवाही कायद्यानुसार मागे घेण्यात यावी अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत.” – अमित (बापू) ढावरे, अध्यक्ष, वीर योद्धा प्रतिष्ठान

Post a Comment

0 Comments