पुणे : प्रतिनिधी
कामावरून घरी परतणाऱ्या एका तरुणावर तिघा हल्लेखोरांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील धनकवडी भागात घडली. हल्ला इतका भयानक होता की, कोयता थेट तरुणाच्या डोक्यात अडकला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. वैभव सचिन नाईकनवरे (वय १९, रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, शंकर महाराज वसाहत, धनकवडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र कार्तिक धनाजी गायकवाड (वय १६, रा. संभाजीनगर, धनकवडी) हाही या हल्ल्यात जखमी झाला आहे.
ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रोडवरील चव्हाणनगर कमान येथील एशियन पेंट्स शोरूमसमोर घडली. या प्रकरणी वैभवच्या आईने शितल सचिन नाईकनवरे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी तिघा अज्ञात आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पूर्वीचे वाद बनले हल्ल्याचे कारण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हा अप्पा बळवंत चौकातील सरस्वती बुक डेपोमध्ये काम करतो. त्याचे कामाचे वेळ सकाळी १० ते रात्री १० पर्यंतचे आहे. २६ एप्रिल २०२५ रोजी वैभव आणि त्याचे मित्र अथर्व ढेबे, नकुल शिंदे, सक्षम कांबळे यांची किरण पांगारे आणि मयुर विष्णु जावीर यांच्याशी वाद झाले होते. त्या वादानंतर मयुर जावीर याने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सोमवारी काम आटोपून वैभव आणि त्याचा मित्र कार्तिक बसने घरी येत होते. पद्मावती बसस्टॉपवरउतरून दोघे पायी जात असताना, चव्हाणनगर कमानजवळ अचानक तिघा अज्ञात तरुणांनी त्यांच्या वाटेत येत कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे हल्ला इतका जबरदस्त होता की कोयता वैभवच्या डोक्यातच अडकला.
पोलिसांचा तपास सुरु
जखमींना तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैभवची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, हा हल्ला पूर्वीच्या वादातून झाला की दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून, हे स्पष्ट होणे बाकी आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.
0 Comments