पुरंदर आणि बारामती तालुक्याच्या सीमेवरून जाणाऱ्या नीरा-मोरगाव मार्गावर रविवारी दुपारी नीरा नजीक चौधरवाडी गावच्या हद्दीत बोलेरो जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे आजोबा गंभीर जखमी झाले आहेत.
मृत मुलाचे नाव स्वराज अजित मेमाणे (वय ७) असे असून, जखमी आजोबांचे नाव राधुनाथ बबन मेमाणे (वय ५०) आहे. हे दोघेही दौंड तालुक्यातील खोपोडी येथील रहिवासी आहेत. दिवाळीनंतर आपल्या मुलीला सासरी सोडण्यासाठी राधुनाथ मेमाणे हे गडदरवाडी (ता. बारामती) येथे आले होते. परतीच्या प्रवासात बोलेरो जीप (क्र. MH-47-JE-6628) या वाहनाला समोरून येणाऱ्या टँकरला चुकवताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बोलेरो रस्त्याच्या कडेला जाऊन दगडाला जोरदार धडकली.
अपघात इतका भीषण होता की लहान स्वराजचा जागीच मृत्यू झाला, तर आजोबा राधुनाथ मेमाणे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नीरा पोलीस चौकीचे कर्मचारी संदीप मदने आणि प्रसाद कोळेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याच रस्त्याने प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाने तत्परता दाखवत आपल्या चारचाकी वाहनातून जखमींना नीरा येथील दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वराज आपल्या आत्याला आजोबांसोबत सोडायला आला होता. दिवाळी भाऊबीजसाठी आत्या खोपोडी येथे माहेरी गेली होती. तिला गडदरवाडी येथे तिचे वडील आणि भाचा सोडायला आले होते. दुपारी काही वेळ स्वराज आपल्या आत्याच्या घरासमोरील पटांगणात आनंदाने खेळत होता. त्याचे निरागस बोबडे बोल सर्वांना भावले होते. काहीच तासांत त्याने सर्वांची मने जिंकली होती. परंतु काही क्षणांतच झालेल्या या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.



0 Comments