Daund | पाटस परिसरात पुन्हा रक्तरंजित सूड? 2021 च्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ निर्घृण हत्या

 


दौंड:प्रतिनिधि 

                दौंड तालुक्यातील पाटस परिसरात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची सावली पुन्हा गडद झाली आहे. 2021 मधील रक्तरंजित घटनेतील एका आरोपीची शुक्रवारी (ता. 20) रात्री पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभजवळ निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे पाटस व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मृत युवकाचे नाव महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय 29, रा. पाटस, ता. दौंड) असे आहे. या प्रकरणी महेश मारुती टुले यांनी दौंड पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद माकर, विकी शितकल, संतोष शितकल (रा. आंबिकानगर, पाटस) तसेच अन्य दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध खून व जीवघेण्या हल्ल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.



कशी घडली घटना?



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास भागवत आपल्या साथीदारांसह दुचाकीवरून पाटसकडे परतत होता. मुकदमवाडी उड्डाणपुलावर पोहोचताच पाठीमागून आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत ते खाली कोसळताच हल्लेखोरांनी कोयता व सत्तूरसारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या भागवतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.


या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार करीत आहेत. संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



2021 च्या दुहेरी हत्याकांडाची पार्श्वभूमी



दरम्यान, 4 जुलै 2021 रोजी पाटस येथील तामखडा परिसरात शिवम शितकल आणि गणेश माकर या दोन तरुणांची निर्घृण हत्या झाली होती. त्या दुहेरी हत्याकांडात महेश उर्फ मन्या भागवत याच्यासह काही जणांवर यवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. संबंधित आरोपी सध्या जामिनावर बाहेर होते.


कुरकुंभजवळ झालेल्या या हल्ल्यात जुन्या प्रकरणातील तिघांना लक्ष्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यापैकी भागवतचा मृत्यू झाला असून उर्वरित दोघे जखमी असल्याचे समजते.



सूडाचा बदला?


या घटनेमुळे 2021 च्या दुहेरी हत्याकांडाचा सूड उगवला गेला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाटस व आसपासच्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत 


Post a Comment

0 Comments