Baramati | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीकडे दुर्लक्ष. शासकीय आदेश धाब्यावर? जिओ-टॅगिंग फोटोसह अहवाल सादर करण्याचे BDO यांचे आदेश..?

 


बारामती: प्रतिनिधी

                          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीत जयंती साजरी करून दोन कर्तृत्ववान महिलांचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार' देऊन गौरव करणे बंधनकारक असतानाही, बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय आस्थापनांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

                    कोराळे खुर्द येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सूरज  खोमणे यांनी या प्रकरणी बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या ग्रामसेवक, मुख्याध्यापक आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायती, शाळा, ग्रामसेवक आणि मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा बजावत ३१ मे रोजी झालेल्या कार्यक्रमांचे जिओ-टॅगिंग (Geo-tagged) छायाचित्रांसह अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित विभागात एकच खळबळ उडाली असून अनेकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे.

                   दरम्यान, शासनाच्या स्पष्ट परिपत्रकानंतरही जयंती साजरी न करणे आणि महिला सन्मान पुरस्कारांचे वितरण न करणे हा गंभीर प्रकार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. महापुरुषांच्या जयंतीबाबत उदासीनता दाखवणाऱ्या तसेच महिलांच्या सन्मानाशी संबंधित शासकीय उपक्रमांची अंमलबजावणी न करणाऱ्या जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सूरज खोमणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

आता पंचायत समितीच्या चौकशीत कोणत्या ग्रामपंचायती, शाळा आणि संबंधित अधिकारी दोषी आढळतात तसेच त्यांच्यावर कोणती प्रशासकीय कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments