पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला. बारामती मधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत एका तरुणीने भरसभेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तरुणीला रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना ही घटना घडली. सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच संबंधित तरुणीने अचानक सभागृहात प्रवेश केला आणि सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. हा प्रकार घडताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. मात्र, तेथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करत तरुणीला रोखले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पीडित तरुणीने बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचा दावा तिने केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आणि प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने उद्विग्न होऊन हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचेही तिने सांगितले.
या घटनेनंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली असून, या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात येत आहे.


0 Comments