वडगाव निंबाळकरमध्ये धक्कादायक प्रकार – मैत्री, अश्लीलता आणि ब्लॅकमेलिंगचा खेळ…!

 

                        पुरंदर रिपोर्टर Live 

बारामती | वडगाव निंबाळकर 

                महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थीनीशी मैत्री करत नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात घडला आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना १६ जानेवारी २०२५ ते २९ जून २०२५ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी पार्थ शिंदे (रा. किल्लज, ता. तुळजापूर), रोहन चाबुकस्वार (रा. करंजेपुल, ता. बारामती), सुरज दत्तात्रय भोसले (रा. पुणे), हनुमंत शिंदे (रा. लातूर), विजय मोजगे (रा. किल्लज, ता. तुळजापूर) आणि तुषार जगदाळे (पत्ता माहित नाही) अशा सहा जणांवर १९ वर्षीय विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत माहिती अशी की, फिर्यादी विद्यार्थीनीच्या मैत्रिणीने आरोपी पार्थ शिंदे याच्याशी डिसेंबर २०२४ मध्ये ओळख करून दिली होती. त्यानंतर पार्थ हा संबंधित विद्यार्थीनीला सातत्याने फोन करून बोलू लागला. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली. या दरम्यान, दि. १३ जानेवारी २०२५ रोजी पीडितेचा वाढदिवस होता. त्यावेळी पार्थ शिंदे याने नीरा येथील ‘हॅशटॅग कॅफे' येथे तिला भेटून तिच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर दि. १६ जानेवारी २०२५ रोजी पीडिता महाविद्यालयात असताना पार्थ शिंदे याने माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असं सांगत शरीरसुखाची मागणी केली.

पीडितेने नकार दिल्यानंतर त्याने तिचा सतत पाठलाग करत पिच्छा पुरवला. याचदरम्यान, करंजेपूल येथील 'द कॉफी कॅफे' येथे भेटल्यानंतर नकळत तिचा व्हिडिओ काढला आणि मिठी मारून तिचा विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता पार्थ शिंदे याने पीडितेला व्हॉट्सअॅप कॉल करून तिचे कपडे काढण्यास भाग पाडत तिचा नग्न व्हिडिओ तयार केला. तू माझ्याशी संबंध ठेवले नाहीत, तर हे व्हिडिओ मी तुझ्या कुटुंबीयांना पाठवेन असं म्हणत तिला धमकावलं.




त्यानंतर त्याने वेगवेगळ्या नंबरवरुन पीडितेच्या बहिणीला आणि नातेवाईकांना वाढदिवसाचे फोटो, मित्रांसोबतचे फोटो आणि नग्न व्हिडिओ पाठवले. दि. २९ जून रोजी पार्थ शिंदे याच्यासह रोहन चाबुकस्वार, सुरज भोसले, हनुमंत शिंदे, विजय मोजगे आणि तुषार जगदाळे यांनी पीडितेच्या बहिण व नातेवाईकांना वारंवार फोन केले. तुमच्या मुलीने मला फसवलं आहे. आम्ही गेली दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये असून ती अन्य चार-पाच मुलांसोबत रिलेशनमध्ये आहे असं सांगत तिची बदनामी केली. तर रोहन चाबूकस्वार याने पीडितेला फोन करत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार वडगाव निंबाळकर पोलिसांनी पार्थ शिंदे, रोहन चाबूकस्वार, सूरज भोसले, हनुमंत शिंदे, विजय मोजगे आणि तुषार जगदाळे या सहाजणांवर भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ (१), ७८, ७९, ३५२, ३५१(२), ३५१ (३), ३ (५), अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (२), ३ (१) थ(ख), (खख ) 6 आणि माहीती व तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (ई), ६७, ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.




दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पोलिस यंत्रणेकडून याबाबत काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments