पुरंदर रिपोर्टर live भिगवण (पुणे ग्रामीण) | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील भिगवण बाजारपेठेत मंगळवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी सुमारे चारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. दोन आरोपींनी 21 वर्षीय तरुणीच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात लाल तिखट फेकून तिचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
काय घडले नेमके?
पीडित तरुणी तिच्या आई आणि भावासोबत बाजारपेठेत खरेदीसाठी आली होती. त्यावेळी जहीर हारुन शेख आणि आयन हारुन शेख या दोघा आरोपींनी त्यांची गाडी अडवली. अचानक हल्ला करत आरोपींनी मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकले. यामुळे दोघेही गोंधळून गेले असताना आरोपींनी आईला मारहाण केली आणि तरुणीला जबरदस्तीने घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे हे दोघे आरोपी सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.
विवाहाच्या काही दिवस आधीच घटना
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही दौंड तालुक्यातील असून तिचा काही दिवसांत विवाह होणार होता. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला आहे. अपहरणाची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पोलिसांची नाकाबंदी, शोधमोहीम सुरू
घटना दौंड तालुका आणि भिगवण परिसरात घडल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. विविध ठिकाणी तपास पथके रवाना करण्यात आली असून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
पोलीस अधिक तपास करत असून, संबंधित तरुणीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे भिगवण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

0 Comments