बारामती:प्रतिनिधी
बारामती शहरात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आपापसातील वादातून दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या मित्रावर दगडाने प्राणघातक हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय २०, रा. बारामती) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी अविनाशच्या डोक्यात दगड घालून त्याला अमानुष मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत अविनाश घटनास्थळीच कोसळला असून काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींना त्यांच्या कृत्याची जाणीव झाल्यानंतर दोघेही थेट पोलीस ठाण्यात हजर झाले.
समीर इक्बाल शेख (वय २५, रा. देवळे इस्टेट, बारामती) आणि प्रथमेश राजेंद्र दळवी (वय २०, रा. जगतापमळा, बारामती) अशी आरोपींची नावे असून त्यांनी पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतले असून घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू आहे..!
या घटनेमुळे बारामती शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हत्या नेमकी कोणत्या कारणातून घडली, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. पुढील कारवाई सुरू असून लवकरच अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.



0 Comments