सोमेश्वरनगर वाणेवाडीत चार दशकांनंतर गुरु-शिष्य आणि वर्गमित्रांची भावनिक भेट ; आठवणींना उजाळा देत स्नेहमेळाव्याचे आयोजन

 

                सोमेश्वरनगर  प्रतिनिधी.   

      शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत, गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सहाध्यायी मित्र-मैत्रिणींशी पुन्हा एकदा मनसोक्त गप्पा मारण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी येथील इयत्ता दहावी (सन १९८२–८३) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

        या स्नेहमेळाव्याचे आयोजन १९८२–८३ या शैक्षणिक वर्षात दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. कार्यक्रमाला स्थानिक माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन तसेच संस्थेचे संस्थापक कै. घोलप साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर सामुदायिक प्रार्थना व राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अध्यापक श्री. इनामदार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. काळे सर उपस्थित होते. यावेळी दिवंगत शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्या स्मृतीस अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ चव्हाण यांनी केले, तर प्रास्ताविक प्रताप गायकवाड व बाळासाहेब बारवकर यांनी मांडले.

        या स्नेहमेळाव्यात एकूण ६५ माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, १४ शिक्षक आणि ५ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. चार दशकांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या गुरुजन आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व भावुकता स्पष्ट दिसत होती. वर्गमित्रांच्या भेटीने शाळेतील आठवणी पुन्हा जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

        स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित गुरुजनांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला लेक्चर स्टँड भेट देण्यात आला. “सध्या मी कोण?” या उपक्रमातून प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपली ओळख करून दिली. विद्यार्थ्यांच्या वतीने विठ्ठल थोरात, तर विद्यार्थिनींच्या वतीने नलिनी भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गुरुवर्यांच्या वतीने मा. शिंदे सर, शेख सर, मनेर सर, बोऱ्हाडे सर, पठाण सर, वाघमारे सर तसेच प्रमुख पाहुणे काळे सर आणि अध्यक्षीय मनोगत श्री. इनामदार सर यांनी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाळासाहेब वाबळे यांनी केले.

        हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बाळासाहेब चव्हाण, अतुल कोरडे, वासुदेव सावळकर, विजय वाडकर, मेहमूद शेख, नानासाहेब फरांदे, छोटे साहेब मुळीक, हनुमंत महामुनी आदी स्थानिक माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेह, स्मृती आणि कृतज्ञतेचा संगम असलेला हा स्नेहमेळावा सर्व सहभागींसाठी अविस्मरणीय ठरला.

Post a Comment

0 Comments