कोऱ्हाळे - प्रतिनिधी
३१ डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस. या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक ठिकाणी मद्यप्राशनाचे प्रकार दिसतात. मात्र याच दिवशी गेली दहा वर्षे सातत्याने “दारू नको, दूध प्या” असा संदेश देत समाजप्रबोधन करणारा एक अवलिया सोमेश्वरनगर परिसरात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावातील अनिल खोमणे हा तरुण गेली दहा वर्षे व्यसनमुक्तीच्या चळवळीत सक्रिय आहे. “राम कृष्ण हरी” या टोपणनावाने पंचक्रोशीत परिचित असलेले खोमणे, युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व्यसनमुक्तीसाठी काम करत आहेत. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा यांसारख्या अंमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःचा वेळ आणि मेहनत समाजासाठी अर्पण केली आहे.
यंदा त्यांच्या या उपक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोऱ्हाळे बुद्रुक बस स्थानकासमोर हा उपक्रम पार पडला. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दूध देत या उपक्रमात सहभाग नोंदवला. मद्यप्राशनाला फाटा देत दूध पिण्याचा संदेश देण्यात आला आणि नववर्षाचे स्वागत आरोग्यदायी संकल्पाने करण्यात आले.
अनिल खोमणे यांच्या या उपक्रमामुळे तरुणांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण होत असून, “नववर्षाची सुरुवात चांगल्या सवयींनी करा” हा संदेश समाजात रुजत आहे. दहा वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या चळवळीचे सर्वत्र कौतुक होत असून, हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.


0 Comments