पुणे | प्रतिनिधी.
CRG Academy या संस्थेमध्ये गेल्या काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता सुरू असल्याचा गंभीर आरोप करत भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी महाज्योतीचे संचालक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, CRG Academy ला महाज्योती, सारथी, बार्टी व तार्ती या शासकीय संस्थांकडून विविध स्पर्धा परीक्षा व NET-SET कोचिंगसाठी कोट्यवधी रुपयांचे टेंडर मिळाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक वेळा कोणतेही विद्यार्थी उपस्थित नसतानाही नियमित लेक्चर्स दाखवले जात असून विद्यार्थ्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर निधी उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वैभव सोलनकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, CRG Academy चा प्रमुख भागीदार चंदन सिंग हा महाज्योतीचा टेंडर सल्लागार म्हणूनही कार्यरत होता. या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या अकॅडमीसाठी मागील चार ते पाच वर्षांपासून टेंडर मिळवण्यात आले आणि यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला. कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी चंदन सिंगने अकॅडमीमधून राजीनामा दिल्याचे दाखवले असले, तरी प्रत्यक्षात तोच सर्व व्यवहार बाहेरून नियंत्रित करत असल्याचा आरोप आहे.
तसेच सारथी व महाज्योती या दोन्ही संस्थांकडून NET व SET कोचिंगसाठी मिळालेल्या टेंडरमध्ये एकाच वेळेस (ओव्हरलॅपिंग) वर्ग घेऊन दोन्ही संस्थांकडून निधी उचलल्याचा गंभीर मुद्दाही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. याशिवाय वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने अनेक संस्था उघडून, त्यामध्ये स्वतः भागीदार राहून विविध नावाने टेंडर मिळवून शासकीय योजनांमधून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणात चंदन सिंग व त्याच्याशी संबंधित सर्व संस्था व कंपन्यांना महाज्योती, सारथी, बार्टी व तार्ती या संस्थांकडून तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
५ जानेवारी पासून उपोषण करणार असल्याची माहिती वैभव सोलनकर यांनी दिली. “ही बाब अत्यंत गंभीर असून यात सरकारी कोट्यवधी रुपयांचा गैरवापर झाल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाज्योतीचे संचालक यांच्याकडे केली आहे.

0 Comments