पुरंदर रिपोर्टर लाईव्ह | पुणे | प्रतिनिधी
राज्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया अखेर नव्या वर्षात सुरू होण्याची चिन्हे आहेत. आरक्षणाच्या अडचणींमुळे रखडलेल्या ३२ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांपैकी पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात असून संभाव्य निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा समोर आली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने निवडणुकांवर अडथळा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आयोगाने टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचा विचार केला असून पहिल्या टप्प्यात अटींची पूर्तता झालेल्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून ८ जानेवारीपूर्वी अधिकृत घोषणा होऊ शकते.
दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, आरक्षण मर्यादेचा प्रश्न कायम असल्याने सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होणे अवघड ठरणार आहे. सध्या २० जिल्हा परिषद आणि २११ पंचायत समित्यांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याचा आयोगाचा मानस आहे.
पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे?
३२ जिल्हा परिषदांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये आरक्षण नियमांचे पालन झाले असून त्या ठिकाणी जानेवारी महिन्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. आयोगाचा २१ दिवसांत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ६ ते ८ जानेवारीदरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता असून उर्वरित २० जिल्ह्यांतील निवडणुका ३१ जानेवारीनंतरच घेतल्या जातील.
१२ जिल्हा परिषदांसाठी संभाव्य निवडणूक वेळापत्रक
• निवडणूक कार्यक्रम जाहीर – ६ ते ८ जानेवारी
• उमेदवारी अर्ज दाखल – १० ते १७ जानेवारी
• अर्जांची छाननी व माघार – १८ ते २० जानेवारी
• चिन्ह वाटप – २१ जानेवारी
• मतदान – ३० जानेवारी
• मतमोजणी – ३१ जानेवारी
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला वेग येणार असून जिल्हा परिषद निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.



0 Comments