सोमेश्वरनगर. प्रतिनिधी.
शिवा काका कारंडे फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेणुका कारंडे (DRP, कृषी विभाग) यांच्या पुढाकारातून आशा वर्कर्सच्या संघर्षमय जीवनावर आधारित, सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित “अशा” चित्रपट होळ प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत निंबुत ते कोऱ्हाळे येथील सर्व आशा वर्कर्ससाठी बारामती येथील तारा सिनेमा हॉलमध्ये खास दाखवण्यात आला.
शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी जवळच्या चित्रपटगृहात शो उपलब्ध नसल्याने तसेच संध्याकाळी ७ वाजताच्या बारामतीतील शोला जाणे सर्व आशा वर्कर्सना शक्य नसल्याने, सर्व आशांनी रेणुका कारंडे यांच्याकडे चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या विनंतीची तात्काळ दखल घेत सोमवारी दुपारी १२ वाजताचा पूर्ण शो बुक करण्यात आला, तसेच सर्वांसाठी ५० सीटर लक्झरी बसची व्यवस्था करण्यात आली.
बसने बारामतीकडे जाताना आशा भगिनींनी गाणी गात आनंद व्यक्त केला. चित्रपटासोबतच ही एक आनंददायी सहल ठरली. चित्रपट पाहताना आशा वर्कर्स देखील भावनिक झाल्या होत्या, कारण पडद्यावर उमटलेले संघर्षमय जीवन त्यांच्या स्वतःच्या दैनंदिन वास्तवाशी थेट जुळणारे होते.
चित्रपटानंतर सर्वजणी भावुक मनःस्थितीत आनंदनगर येथील आरोग्य केंद्रात परतल्या. यावेळी सर्व आशा व CRP मिळून ५५ महिलांनी या उपक्रमाचा मनापासून आनंद घेतला. सर्वांनी रेणुका कारंडे यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम आशा वर्कर्सच्या सन्मान, प्रेरणा आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



0 Comments