पुरंदर रिपोर्टर Live
सोमेश्वरनगर | प्रतिनिधी
सोमेश्वर सेवाभावी संस्था व सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमेश्वर देवस्थान, करंजे येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यास नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संदिप बांदल तसेच बारामती तालुका युवक अध्यक्ष माऊली पोमणे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संभाजीनाना होळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कोणत्याही पदावर काम करताना काहीवेळा कार्यकर्त्यांची नाराजी वाढते, मात्र पक्ष संघटन मजबूत ठेवण्यासाठी सक्रिय कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाते, असे त्यांनी सांगितले. सहकारी संस्था, साखर कारखाने, खरेदी-विक्री संघ, बारामती बँक, दूध संघ आदींवर पदाधिकारी निवडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणुकीच्या वेळी इच्छुकांची संख्या वाढते; तिकीट न मिळाल्याने जबाबदारीने काम करणाऱ्यांवर आरोप होतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने वेळोवेळी घेतलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहणारे व लोकमत असलेले कार्यकर्ते पुढे येतील, असा संदेश त्यांनी दिला. तसेच सुखदेवराव शिंदे यांच्या उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंतराव मोकाशी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, “नाना होळकर यांची कार्यपद्धत सर्वसमावेशक असून त्यांच्या कामाची दखल घेऊन अजितदादांनी त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. आता त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे,” असे सांगितले.
सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले व संभाजी होळकर, संदिप बांदल आणि माऊली पोमणे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास निरा बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब शिंदे, उद्योगपती संतोषराव कोंढाळकर, करंजे सरपंच भाऊसाहेब हूंबरे, उद्योजक दीपक साखरे, चौधरवाडीचे माजी उपसरपंच तानाजी भापकर,, माजी सैनिक संघटनेचे कायदेशीर सल्लागार अॅड. गणेश आळंदीकर, सोरटेवाडीचे माजी सरपंच दत्तात्रय शेंडकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल हूंबरे, शिवाजी शेंडकर, धनंजय शेंडकर, संताजी गायकवाड, विष्णू दगडे, सुनील केंजळे, करंजेपूलचे माजी सरपंच वैभव गायकवाड, सागर गायकवाड, निलेश गायकवाड, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सुचिता साळवे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र भांडवलकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन पाटोळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव विपुल भांडवलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0 Comments