पुरंदर रिपोर्टर लाईव्ह.
सोमेश्वरनगर. प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर येथील भारतातील पहिली इंदिरा गांधी महिला तांत्रिक शिक्षण संस्था, दीपउजाला सोशल फाउंडेशन, साई सेवा हॉस्पिटल व बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ३५० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.
महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे तसेच त्यांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिरात ११० महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली, त्यापैकी ८ महिलांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तसेच ४५ महिलांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय २८ महिलांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. १६५ महिलांची विविध आजारांवर सर्वसाधारण मोफत तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी महिलांचे तांत्रिक शिक्षण, आत्मनिर्भरता, स्वावलंबन तसेच आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिबिरासाठी संस्थेचे सचिव नितीन कुलकर्णी यांच्यासह स्त्रीरोग तज्ञ डॉ. जयश्री भिलारे, डॉ. नीता शिंगटे, डॉ. शमा केंजळे, डॉ. संध्या खळतकर यांनी वैद्यकीय सेवा दिली.
कार्यक्रमास दीपउजाला सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक साखरे, उपप्राचार्य जया कदम, उपप्राचार्य राहुल गोलांडे, कार्यक्रम समन्वयक संदीप गायकवाड, संजय घाडगे, भीमराव बनसोडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण भोसले, चेतन सकुंडे, सारिका जगताप, शामा बागवान, राणी काकडे, जयश्री देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी मोहिते यांनी केले, तर संस्थेच्या संचालिका उज्वला लोखंडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. महिलांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

0 Comments