सोमेश्वरनगर | प्रतिनिधी.
निरा–बारामती रोडवरील खामगळवाडी पाटी नजीक झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात विकास कुंडलिक कांबळे आणि सुरेश रामेश्वर सोनवर (रा. मालेगाव, ता. गेवराई, जि. बीड) या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
बारामती तालुक्यात ऊस तोडीसाठी गेवराई तालुक्यातील मालेगाव येथून आलेले हे तरुण दुचाकीवरून (MH 17 AQ 0168) बारामतीकडून निराकडे जात होते. त्याचवेळी बारामती आगाराची एसटी बस (MH 42 BT 4421) निरा बाजूकडून बारामतीकडे येत होती. दरम्यान खामगळवाडी पाटी नजीक दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला.
या अपघातात दुचाकीवरील तरुण एसटी बसच्या चालक बाजूच्या चाकाला धडकले. एसटी चालकाने अपघात टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्याचे काम सुरू असल्याने बस रस्त्याखाली घेणे शक्य झाले नाही आणि अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणांना तात्काळ बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र अपघातात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने एका तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या तरुणाला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मयत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.

0 Comments