पुरंदर रिपोर्टर Live
कुरकुंभ. प्रतिनिधी
रूढी व परंपरांचा वारसा जपण्याच्या उद्देशाने श्री फिरंगाई देवीचे वंशपरंपरागत पुजारी भगत, गुरव तसेच कुरकुंभ ग्रामस्थ यांच्या वतीने श्री फिरंगाई देवी (माळावरची देवी) चा पारंपरिक गोंधळ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा धार्मिक कार्यक्रम रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी संपन्न होणार असून, त्यानिमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे पारंपरिक धार्मिक विधींचे संवर्धन व जतन करणे हा आहे. स्थानिकांच्या मते, ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून गावाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. इतिहासातही या मंदिराचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी देखील येथे गोंधळ साजरा केल्याची परंपरागत नोंद आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
यंदाचा गोंधळ सोहळा देवीचे मानाचे गोंधळी महादेव मुळे (शिर्सुफळ) यांच्या हस्ते सादर केला जाणार आहे. भक्तिमय वातावरणात होणाऱ्या या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रूढी-परंपरेचा वारसा जपत गावात पुन्हा एकदा भक्तिरसाची अनुभूती घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

0 Comments