निरा (ता. पुरंदर)
येथील पालखी तळ परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १२ लाख ६२ हजार ७६० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे तत्काळ वेगाने फिरवली आहेत.
जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 39/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305, 331(4), 331(5) अन्वये अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात निरेतील प्रसिद्ध व्यावसायिक उत्तम किसनराव आगवणे (वय ६९) यांनी फिर्याद दिली आहे. आगवणे यांचे मोरगाव येथे पेट्रोल पंप, निरा बस स्थानकासमोर चप्पल दुकान तसेच राधाकृष्ण मंगल कार्यालय असे विविध व्यवसाय असून ते सातारा रोड, निरा येथील स्वतःच्या इमारतीत वास्तव्यास आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी घरात नसताना अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम चोरून नेण्यात आली.
चोरट्यांनी पेट्रोल पंपावरील विक्रीची ५,३७,७६० रुपयांची रोख रक्कम तसेच कार्यालय व चप्पल दुकानातील १,५०,००० रुपयांची रोकड चोरली. याशिवाय सुमारे ७.५ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र (३,२५,००० रुपये), २ तोळ्याचे सोन्याचे नेकलेस (१,००,००० रुपये), अर्धा तोळ्याची सोन्याची चैन (२५,००० रुपये), तीन सोन्याच्या अंगठ्या (५०,००० रुपये) आणि सहा जोड सोन्याचे टॉप्स (७५,००० रुपये) असा एकूण १२,६२,७६० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
घटनेची अधिकृत नोंद शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३३ वाजता करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच पुणे गुन्हा अन्वेषण विभाग यांनीही या गंभीर घटनेची दखल घेत तपास वेगाने सुरू केला आहे.
या धाडसी घरफोडीमुळे निरा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

0 Comments