पुणे-:बारामती
पुणे : शहरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढताना दिसत आहे. मुंबईला गेट वे वर फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या कुटुंबातील कमल लाकडे (वय ७८) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लाकडे कुटुंबातील ओंकार लाकडे, रोहित लाकडे, शोभा लाकडे आणि कमल लाकडे हे काही दिवसांपूर्वी मुंबईला फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांना ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर त्यांची कोविड-१९ चाचणी करण्यात आली असता चौघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले.
रुग्णांपैकी ओंकार लाकडे आणि रोहित लाकडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर ऑक्सिजन आणि आयसीयू उपचार सुरू आहेत. तर शोभा लाकडे यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कुटुंबातील कमल लाकडे यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्य विभाग सतर्क झाला असून परिसरात तपासणी आणि खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, गर्दी टाळावी आणि लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

0 Comments