राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी पुढील आठवड्यात मोठी पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या पत्रकार परिषदेबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
आज जय पवार यांनी विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पिंकी माली हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. पिंकीच्या आईवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती आणि कालच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर जय पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धीर दिला आणि दुर्घटनेबाबत चर्चा केली.
माध्यमांशी बोलताना जय पवार म्हणाले की, पत्रकार परिषद घेऊ नये असा कोणताही दबाव आपल्यावर नाही. पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या पत्रकार परिषदेत विमान दुर्घटनेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी संकेत दिले.
दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जय पवार म्हणाले की, काहीजण आपल्यावर दबाव असल्याचे बोलत आहेत, मात्र त्यात कोणतेही तथ्य नाही. तसेच काही लोकांना VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करू नये, असा सल्ला आपण दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी व्हावी ही मागणी आपण कायम ठेवली असल्याचे जय पवार यांनी पुन्हा स्पष्ट केले. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या त्यांच्या पत्रकार परिषदेत नेमके कोणते खुलासे होतात आणि या प्रकरणाला कोणते नवे वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments