बारामती : प्रतिनिधी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती पंचायत समितीच्या गटनेतेपदी मोरगाव पंचायत समिती गणातून विजयी झालेले बाबा चोरमले यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली.
पळशी गावचे माजी सरपंच म्हणून कार्य करताना बाबा चोरमले यांनी ग्रामविकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्त्यांची कामे तसेच शेतकरीहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांशी त्यांचा थेट व विश्वासार्ह संवाद राहिला आहे.
गटनेता म्हणून पंचायत समितीतील सदस्यांमध्ये समन्वय साधणे, शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि विकासकामांना गती देणे या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असणार आहेत. विशेषतः शेतीपूरक उद्योग, पाणी व्यवस्थापन, ग्रामीण पायाभूत सुविधा, महिला बचतगटांचे सक्षमीकरण तसेच युवकांसाठी कौशल्याधारित रोजगारनिर्मिती यावर भर देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना बाबा चोरमले यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत ही जबाबदारी सन्मानाची असल्याचे सांगितले. सर्व सदस्यांना सोबत घेऊन स्वर्गीय अजित पवार यांच्या विचारांची प्रेरणा जपत बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

0 Comments