माळेगाव | प्रतिनिधी
माळेगाव नगरपंचायतीतील प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांना गती देण्यासाठी नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांनी आज मुंबई येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ‘देवगिरी’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत शहरातील विविध विकासकामां बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान माळेगावच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न प्राधान्याने मांडण्यात आला. ही योजना तातडीने सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी सातपुते यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
तसेच शहरातील भूमिगत गटार योजनेबाबतही सविस्तर चर्चा झाली. स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत ती लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बारामती तालुक्यात सध्या सुरू असलेल्या भारनियमनाच्या वेळापत्रकामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली. यावरही सकारात्मक चर्चा होऊन यामध्ये सुधारणा करण्याबाबत संकेत मिळाले. दरम्यान, माळेगावमध्ये प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीसंदर्भातही उपमुख्यमंत्री पवार यांनी माहिती घेतली. हे काम लवकर सुरू करून पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला देणार असल्याचे सांगितले.
एकूणच या बैठकीत माळेगावच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाल्याने आगामी काळात विकासकामांना वेग येणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

0 Comments