बारामती | प्रतिनिधी.
थोपटेवाडी गावातील काही भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन रस्त्याच्या कामादरम्यान फुटल्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून संतप्त नागरिक व महिला भगिनींनी पंचायत समिती बारामती येथे धडक देत पाणीपुरवठा तात्काळ सुरू न झाल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली. भर उन्हात मुख्य रस्त्यावर उभे राहून त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि फुटलेल्या पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांनी सरपंच रेखा बनकर, ग्रामसेविका वर्षा सालगुडे व ग्रामपंचायत सदस्यांना गावातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन विहीर व बोरवेल उभारण्याचे निर्देश दिले. तसेच पंचायत समितीमार्फतही बोरवेल मंजूर करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निधी अपुरा पडल्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी ग्रामस्थांनी पाणी व इतर मूलभूत सुविधांबाबत विविध प्रश्न मांडले. तातडीने गावाला भेट दिल्याबद्दल नागरिकांनी सभापतींचे आभार मानले आणि पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केली.
यावेळी सभापती किरण तावरे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार, सरपंच रेखा बनकर, ग्रामसेविका वर्षा सालगुडे तसेच अजय पिसाळ, प्रमोद पानसरे, सुधीर यादव, शशिकांत पानसरे, वैशाली धोत्रे, मोहन वाल्हेक, ज्ञानदेव लष्कर, लक्ष्मण चौगुले, जगन्नाथ पिसाळ, आनंद लष्कर, सचिन कांबळे, करण साबळे, हरीष कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments