पुरंदर रिपोर्टर Live
पुणे | प्रतिनिधी
नेट-सेट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन कोचिंग तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे. यासंदर्भात भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी सारथी संस्थेच्या संचालकांना पत्र देत विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे लक्ष वेधले आहे.
सोलनकर यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यात आगामी काळात सहाय्यक प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नेट-सेट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र अद्याप सारथी संस्थेकडून नेट-सेटसाठी ऑफलाइन कोचिंग सुरू करण्यात आलेले नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक विद्यार्थी काही गुणांनी परीक्षेत अपयशी ठरतात आणि त्यांना अधिक चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. नियमित व व्यवस्थित प्रशिक्षण उपलब्ध झाल्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी नेट-सेट परीक्षेत यश मिळवू शकतात, असेही सोलनकर यांनी नमूद केले आहे.
नेट-सेट विद्यार्थ्यांसाठी किमान सहा महिन्यांच्या कालावधीचे नियोजनबद्ध ऑफलाइन प्रशिक्षण सुरू करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच शंका निरसनाची सुविधा मिळेल, अशी मागणी करण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्चाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सारथी संस्थेने नेट-सेट कोचिंग तात्काळ सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर, सरचिटणीस स्वप्नील मोडक, ओमकार कड्डे, अमर बुडगुडे, जीवन साखरे, आबासाहेब थोरात, रोहित शिंदे, युवती प्रमुख रसिक सणस, विवेक साळुंखे, जगदीश कोळेकर, संदीप केसकर, शुभम सूर्यवंशी, सुजित सोरटे आदी पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.
कोट :
“सारथीकडून नेट-सेट प्रशिक्षण पूर्णपणे बंद करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. राज्यात संभाव्य सहाय्यक प्राध्यापक भरती लक्षात घेता नेट-सेट परीक्षेसाठी सहा महिन्यांचे ऑफलाइन प्रशिक्षण तात्काळ सुरू करण्यात यावे.”
— वैभव सोलनकर, जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, पुणे.


0 Comments