पुणे:प्रतिनिधि
पुणे, दि. १२ : पुणे शहरात किरकोळ थट्टा-मस्करीतून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅम्प परिसरात मित्रांमधील वादातून झालेल्या हल्ल्यात फैसल फारुख खान या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फैसल खान आणि आरोपी शहबाज शेख हे एकमेकांचे परिचित मित्र होते. कॅम्प परिसरात सर्व मित्र एकत्र असताना फैसलने शहबाजची थट्टा केली. मात्र ही मस्करी शहबाजच्या मनाला लागली. रागाच्या भरात त्याने फैसलला कानाखाली चापट मारली. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही क्षणांतच तीव्र झाला आणि दोघांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली.
वाद वाढल्यानंतर संतापलेल्या शहबाजने आपल्या इतर साथीदारांना बोलावले. त्यानंतर आरोपींनी एकत्र येत फैसलवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. फैसलच्या छातीवर, पाठीत, हातावर आणि डोक्यावर अनेक वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेला फैसल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोली आणि शहबाज चांद शेख या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर तालिब अली सय्यद आणि अश्रफअली सय्यद या दोन आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
मित्रांमधील साध्या थट्टा-मस्करीचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने कॅम्प परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.

0 Comments