Baramati | सोमेश्वरच्या उपाध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला: कार्यकाळ संपूनही नव्या निवडीला मुहूर्त मिळेना; शेवटच्या संधीसाठी संचालकांमध्ये चढाओढ..? अंतिम निर्णयाची सूत्रे सुनेत्रा पवारांच्या हाती!

 


सोमेश्वरनगर : विजय लकडे

                          सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात सध्या राजकीय घडामोडींनी अक्षरशः वेग घेतला असून, उपाध्यक्षपदाच्या निवडीभोवती निर्माण झालेला सस्पेन्स दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालला आहे. कार्यकाळ संपूनही अद्याप नव्या उपाध्यक्षांची घोषणा न झाल्याने सभासद, संचालक आणि राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

आगामी पंचवार्षिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना, या कार्यकाळातील “शेवटची संधी” नक्की कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवड आता केवळ पदापुरती मर्यादित नसून, आगामी सत्तासमीकरणांची ती एक रंगीत तालीम मानली जात आहे.

•निवडीची पार्श्वभूमी

मागील निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वरवर एकहाती सत्ता स्थापन झाली होती. विरोधकांनाही सोबत घेत त्यांनी भाजप प्रणीत पॅनलचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर सत्तेच्या वाटपानुसार चेअरमनपदी पुरुषोत्तम जगताप यांची वर्णी लागली, तर उपाध्यक्षपद दरवर्षी वेगवेगळ्या संचालकांना देण्याची रणनीती आखण्यात आली होती. या निर्णयानुसार आतापर्यंत आनंदकुमार होळकर, प्रणिता खोमणे, बाळासाहेब कामथे आणि मिलिंद कांबळे यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

•राजीनाम्यावरून तर्कवितर्क

                 दरम्यान, मिलिंद कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचा चर्चांनी जोर धरला आहे. जर राजीनामा दिला असेल, तर नवीन निवड का रखडली? आणि राजीनामा दिला नसेल, तर निर्णयाला विलंब का होत आहे? या प्रश्नांनी सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीतही या विषयावर खलबते झाल्याचे समजते.

या सर्व प्रकरणावर भाष्य करताना सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी स्पष्ट केले की,यासंदर्भात आमचे सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर बोलणे झाले आहे. त्यांनी योग्य निर्णय दिल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडेल. उपाध्यक्ष निवडीचा अंतिम निर्णय हा सुनेत्रा पवार यांचाच असेल.
           -पुरुषोत्तम जगताप [ अध्यक्ष सोमेश्वर कारख़ाना ]



सध्या या निवडीचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याने "शेवटी कोणाची वर्णी लागणार?" याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Post a Comment

0 Comments