अल्पवयीनांकडून चोरी करून भंगार व्यावसायिकाकडे विक्री; एमआयडीसी बारामतीतील दोन चोरींचा पोलिसांकडून पर्दाफाश, तिघांना अटक

 

पुरंदर रिपोर्टर. Live

बारामती | प्रतिनिधी

            एमआयडीसी बारामती परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी यशस्वी उलगडा करत अल्पवयीन मुलांकडून चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकासह तिघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे औद्योगिक परिसरातील चोरीच्या मालिकेला मोठा आळा बसला आहे.

              पहिल्या घटनेत, १३ मार्च रोजी डायनामिक्स कंपनीच्या आवारातून सोलर प्लांटला जोडलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरीस गेली होती. याप्रकरणी १६ मार्च रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली देत चोरीचा माल भंगार व्यावसायिक मोहम्मद शब्बीर मोहम्मद बशीर अन्सारी (वय ३८) याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी अन्सारी याला अटक करून त्याच्याकडून सुमारे १३ किलो तांब्याची तार जप्त केली आहे. अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.



               दुसऱ्या घटनेत, ३ मार्च रोजी एमआयडीसी परिसरातील हिरकणी रियल इस्टेट प्रा. लि. यांच्या गोदामातून तब्बल ६ लाख ५ हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेला होता. यात सुमारे २ लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिकल केबल, ५० हजार रुपये किमतीचे पाण्याचे फिटिंग साहित्य, १५ हजार रुपये किमतीचा आरओ, तसेच सुमारे ३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा व ट्रान्सफॉर्मर ऑईलचा समावेश आहे. या प्रकरणी मच्छिंद्र प्रदीप गव्हाळे, राजू रामा दिवटे, संजय रामा दिवटे आणि सनी भारत पाथरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी राजू रामा दिवटे व संजय रामा दिवटे यांना ५ मार्च रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. चोरीचा उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.

                दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर वीर व राहुल मखरे हे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

                 ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, किशोर वीर, राहुल मखरे, जितेंद्र शिंदे, मनोज पवार, राहुल लांडगे, सचिन तरंगे व आफरीन शेख यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या बजावली.

Post a Comment

0 Comments