सोमेश्वरनगर, प्रतिनिधी.
पुणे जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६ अंतर्गत तालुका व जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ दि. २३ एप्रिल २०२६ रोजी स्वारगेट, पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे होते. यावेळी गजानन पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद), सचिन्द्र प्रताप सिंह (शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य), डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षण अधिकारी माध्यमिक), डॉ. गणपत मोरे (शिक्षण उपसंचालक), हरूण अत्तार (शिक्षण सहसंचालक), महेश पालेकर (शिक्षण संचालक) यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. तसेच जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानात उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वाघळवाडी हिने उल्लेखनीय कामगिरी करत बारामती तालुकास्तरावर प्रथम क्रमांक, तर पुणे जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, संचालिका रोहिणी सावंत व मुख्याध्यापक बाळासाहेब मोटे यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे.

0 Comments