धर्माबाद तालुक्यात गुटखा विक्री जोमात… प्रशासन कोमात?


पुरंदर रिपोर्टर.  Live 

धर्माबाद.  सोमेश स्वामी.  

             धर्माबाद तालुक्यात शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखूची विक्री पुन्हा एकदा जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात गुटखा विक्रीवर स्पष्ट बंदी असतानाही तालुक्यातील अनेक पानटपऱ्या, किराणा दुकाने व काही ठिकाणी गुप्तपणे गुटखा सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

            गुटखा सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांकडून वारंवार सांगितले जाते. तरीही काही विक्रेते नफ्यासाठी नियम धाब्यावर बसवून गुटखा विक्री करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे युवक व अल्पवयीन मुलांपर्यंतही हा घातक पदार्थ सहज पोहोचत असल्याबद्दल पालकवर्गात चिंता व्यक्त होत आहे.

            गुटखा बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाकडून मात्र ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे “गुटखा विक्री जोमात, प्रशासन कोमात” अशी टीका सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

            तालुक्यात तातडीने विशेष मोहीम राबवून गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकां कडून होत आहे. अन्यथा या घातक पदार्थामुळे समाजाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments