निंबुतच्या ओमकारची कर्तृत्वाची झेप; पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक नगररचनाकार पदाला गवसणी.

पुरंदर रिपोर्टर Live 

सोमेश्वरनगर, दि.

           बारामती तालुक्यातील निंबुत येथील ओमकार महादेव लकडे (वय 23)  याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक नगररचना अधिकारी (श्रेणी-१) या प्रतिष्ठेच्या पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे निंबुत, निरा व सोमेश्वर परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

            शेतकरी कुटुंबातून येत मर्यादित साधनसामग्रीत शिक्षण घेत असताना ओमकार यांनी चिकाटी, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले. अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी दिवस-रात्र अभ्यास करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आईचे संस्कार आणि गुरुजनांचे मार्गदर्शन हेच त्यांच्या यशामागील बळ ठरले.

             विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबात यापूर्वीच चुलत बंधू अमरजीत लकडे आणि वहिनी शिवानी लकडे यांनीही सहाय्यक नगररचना अधिकारी (श्रेणी-१) पदावर यश मिळवले आहे. त्यामुळे यशाची ही परंपरा कायम राखत ओमकार यांनी कुटुंबाचा व गावाचा लौकिक अधिक उंचावला आहे. एका कुटुंबातून सलग मिळालेल्या या यशामुळे निंबुत गावाची ओळख अधिक भक्कम झाली आहे.

             ओमकार यांच्या यशाचा आनंद व्यक्त करत निंबुत, निरा व सोमेश्वर परिसरातील मित्रपरिवार व ग्रामस्थांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. “आपल्या गावचा मुलगा इतक्या मोठ्या पदावर पोहोचला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत.

             ओमकार यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून संपूर्ण ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या यशामुळे स्पर्धा परीक्षांकडे वळण्यासाठी अनेकांना नवी दिशा आणि उमेद मिळत आहे. “मेहनत आणि सातत्य असेल, तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही,” हा संदेश त्यांच्या यशातून पुन्हा अधोरेखित झाला आहे.

Post a Comment

0 Comments