सातारा जि.प. अध्यक्षांच्या कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप; अध्यक्षपद धोक्यात ?


पुरंदर रिपोर्टर. Live 

सातारा.   प्रतिनिधी.   

               सातारा जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर अध्यक्षपदावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अध्यक्षपदी निवड झालेल्या प्रिया शिंदे यांच्या कुणबी (ओबीसी) प्रमाणपत्रावर आक्षेप घेत कायदेशीर आव्हान देण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

                 संतोष साळुंखे व जयदीप मगर यांनी अॅड. दत्तात्रय घोडके यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत जात पडताळणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेले कुणबी प्रमाणपत्र अत्यंत कमी कालावधीत देण्यात आल्याबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.

              तक्रारदारांच्या मते, प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने पार पडली असून संबंधित प्रमाणपत्राचा विषय सध्या जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत त्याला वैधता देणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित केला जात आहे. “जलदगतीने प्रमाणपत्र देणे म्हणजे नियमांना बगल देणे का?” असा प्रश्न प्रशासनालाही विचारला जात आहे.



                 दरम्यान, दि. २० मार्च रोजी झालेल्या निवडीत प्रिया शिंदे अध्यक्षपदी, तर राजू भोसले उपाध्यक्षपदी निवडून आले होते. या निवडीत राजकीय डावपेचांचा वापर झाल्याच्या चर्चा आधी पासूनच सुरू होत्या. आता या कायदेशीर वादामुळे संपूर्ण सत्ता समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

                 राजकीय जाणकारांच्या मते, जर संबंधित प्रमाणपत्र अमान्य ठरले, तर अध्यक्षपद धोक्यात येऊ शकते आणि जिल्हा परिषदेत पुन्हा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे सत्ताधारी पक्षावर दबावतंत्र वापरल्याचे आरोप होत आहेत, तर दुसरीकडे विरोधकांना राजकीय संधी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

                सध्या अध्यक्षपद कायम असले तरी कायदेशीर प्रक्रिया सुरू असून अंतिम निर्णय जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments