सोमेश्वरनगरच्या ‘कृष्णाली अभ्यासिके’चा झेंडा उंचावला; सोडमिसे भगिनींची पुणे पोलीस दलात दमदार झेप!

पुरंदर रिपोर्टर लाईव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

                    एकाच कुटुंबातील दोन बहिणींचे एकाच वेळी यश; ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी कामगिरी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर ग्रामीण भागातील मुली आता प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सोमेश्वरनगर येथील ‘कृष्णाली अभ्यासिका’तील दोन सख्ख्या बहिणींनी पुणे शहर पोलीस दलात निवड मिळवत परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

                 निकिता सोडमिसे आणि मिथाली सोडमिसे अशी या यशस्वी भगिनींची नावे असून, २०२४ च्या पुणे शहर पोलीस भरती प्रक्रियेत त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. निकिता सोडमिसे हिने एकूण १२८ गुण मिळवत (मैदानी ४१, लेखी ८७) ‘ओबीसी’ प्रवर्गातून आपले स्थान निश्चित केले, तर मिथाली सोडमिसे हिने १२० गुण (मैदानी ३५, लेखी ८५) मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.



                  एकाच कुटुंबातील दोन मुलींची एकाच वेळी पोलीस दलात निवड होणे ही दुर्मीळ आणि अभिमानास्पद बाब मानली जात असून, या यशामुळे सोमेश्वरनगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांकडून दोन्ही भगिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

                  या यशामागे ‘कृष्णाली अभ्यासिका’चे मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव यांचा मोठा वाटा असल्याची भावना स्वतः विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे. अभ्यासिकेच्या वतीनेही या दोन्ही भगिनींचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

                 ग्रामीण भागातील इतर मुलींसाठी हे यश प्रेरणादायी ठरत असून, “मेहनत आणि योग्य दिशा मिळाल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही,” हा संदेश सोडमिसे भगिनींनी आपल्या कामगिरीतून दिला आहे.

Post a Comment

0 Comments