पोलीस अधिकाऱ्यावर लाचखोरीचा आरोप; धर्माबादमध्ये खळबळ


पुरंदर रिपोर्टर Live

धर्माबाद  सोमेश स्वामी

                धर्माबाद पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकावर आर्थिक व्यवहार करून गुन्हा दाखल केल्याचा आरोप झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पांगरी येथील काही नागरिकांनी थेट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

                मिळालेल्या माहितीनुसार, गावातील घरकुल भरणीच्या कामावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकारी घटनास्थळी आले होते. त्यांनी दोन्ही गटांमध्ये तडजोड घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

                मात्र, त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ते सोडण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रारीनुसार, ट्रॅक्टर सोडण्यासाठी सुमारे ९० हजार रुपये तसेच लाभार्थीकडून आणखी १७ हजार रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. पैसे देऊनही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने अन्याय झाल्याची भावना तक्रारदारांनी व्यक्त केली आहे.

                  या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

                  दरम्यान, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची या आरोपांबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही. त्यामुळे चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments