सोमेश्वरनगर प्रतिनिधी.
बारामती तालुक्यातील गडदरवाडी येथील तीन वर्षा पासून चर्चेत असलेला वादग्रस्त रस्त्याचा प्रश्न अखेर महसूल प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मार्गी लागला आहे. तहसीलदार बारामती यांनी मामलेदार कोर्ट अॅक्ट 1906 च्या कलम 5 अंतर्गत सुनावणी पूर्ण करून दिलेल्या आदेशानुसार संबंधित रस्ता सौरभ बाळासो गडदरे , अनिता गडदरे व कुटुंबीयांस खुला करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडदरवाडी येथील गट क्रमांक 264 मधील पश्चिम बाजूस वहिवाट सर्वे नंबर नुसार असलेल्या दक्षिण-उत्तर दिशेतील जुन्या रस्त्याबाबत काही काळापासून वाद सुरू होता. या मार्गावर अडथळे निर्माण झाल्याने संबंधित कुटुंबाला दैनंदिन ये-जा, शेतीची कामे, कृषी साहित्याची वाहतूक तसेच इतर कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर संबंधितांनी मामलेदार न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंची मते, कागदपत्रे आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर तहसील प्रशासनाने अर्जदारांच्या बाजूने निर्णय दिला. आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित रस्त्यावर भविष्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करता येणार नाही तसेच नागरिकांच्या हक्काच्या मार्गात हस्तक्षेप करू नये.
या आदेशामुळे गडदरे कुटुंबीयांस मोठा दिलासा मिळाला आहे. रस्ता खुला झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामांना गती मिळणार असून वाहतूक आणि दैनंदिन कामकाज अधिक सुलभ होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. रस्ता खुला करतेवेळी गडदरवाडी पोलीस पाटील, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन, गावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
गावातील नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप केल्याने दीर्घकाळ चालत असलेल्या वादाला तोडगा निघाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. महसूल विभागानेही संबंधितांना आदेशाची माहिती देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थानिक स्तरावर या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात असून, भविष्यात अशा प्रकारच्या वादांवर कायदेशीर प्रक्रियेद्वारे तोडगा काढण्याचा संदेश या निर्णयातून मिळत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.


0 Comments