गुळूंचे ते मोरगाव परिसरात रात्री अवकाशात फिरणाऱ्या ड्रोनची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सीसीटीव्हीत ड्रोनची छबी कैद.


पुरंदर रिपोर्टर Live

निरा | प्रतिनिधी

                 निरा–मोरगाव रोडवरील गुळूंचे हद्दीत रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या संशयित ड्रोनमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात रात्री उशिरा आकाशात ड्रोनसदृश वस्तू फिरताना दिसत असल्याने नागरिकांनी याचा धसका घेतला आहे.

                 स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात रात्री ड्रोन दिसल्यानंतर काही ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांची चर्चा सुरू झाली असून त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेकांनी स्वतःहून रात्री गस्त घालण्यास सुरुवात केली असून काही नागरिक रात्रभर जागरण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

                 याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने काही नागरिकांनी घरांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, त्यामध्ये रात्री उडणाऱ्या ड्रोनची छबी कैद झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे.



                    काही नागरिकांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती समोर येत असून, रात्री फिरणाऱ्या ड्रोनने काही घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याच्या घटनाही नागरिकांकडून सांगितल्या जात आहेत. संबंधित घटनेची सत्यता तपासून योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

                    यापूर्वी बारामती, पुरंदर आणि इंदापूर सह संपूर्ण पुणे जिल्ह्यात  रात्रीच्या वेळी ड्रोन दिसल्याच्या घटना चर्चेत आल्या होत्या, त्यावेळी या ड्रोनची मोठी दहशत पहावयास मिळाली होती.  काही महिन्यांच्या शांततेनंतर आता पुन्हा गुळूंचे ते मोरगाव परिसरात रात्रीच्या फिरणाऱ्या ड्रोनची चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments