बारामती प्रतिनिधी.
शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात उघड झाले असून या प्रकरणातील आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ ते ४ मे २०२५ या कालावधीत तांदुळवाडी (ता. बारामती) येथील महिला हॉस्पिटल आणि मळद परिसरात आरोपी अनिकेत धनंजय पाठक याने ‘गट-क अधिपरिचारिका’ पदावर शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अनेकांशी संपर्क वाढवला. त्याने महिला हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स तसेच इतर नागरिकांशी ओळख निर्माण करून विश्वास संपादन केला.
यानंतर अजिंक्य पाठक, सिओना साळवे उर्फ सिओना अनिकेत पाठक, सुधाकर सोळंकी, सागर गायकवाड आणि सुरज असदकर यांच्या मदतीने फिर्यादी व साक्षीदारांकडून वेळोवेळी ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात मोठी रक्कम उकळण्यात आली. संशय येऊ नये म्हणून आरोपींकडून बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कोणालाही नोकरी मिळाली नसल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी मार्च २०२६ मध्ये बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी सुरज तिमयया असदकर हा चिंचवडगाव येथे पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आर्थिक फायद्यासाठी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी या प्रकरणात अजिंक्य पाठक (दौंड) आणि सुधाकर सोळंकी (येरवडा) यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.


0 Comments