बारामती : (मुरूम)
निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी झालेल्या आयशर टेम्पो आणि इलेक्ट्रिक स्कुटीच्या भीषण अपघातात आधीच दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या १२ वर्षीय लहान भावाचीही मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पुण्यात उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याने बोडरे कुटुंबातील तीनही सख्या भावंडांचा अंत झाला असून, संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मुरूम (ता. फलटण) येथील तीन भावंडे आपल्या मामाच्या गावाला (मुर्टी, ता. बारामती) जाण्यासाठी स्कुटीवरून निघाली होती. चौधरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.
सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७) - जागीच मृत्यू
अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५)- जागीच मृत्यू
पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय १२)- उपचारादरम्यान मृत्यू (मंगळवारी रात्री १:३० वाजता)
अपघाताची भीषणता इतकी होती की दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर लहान भाऊ पवन गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने बारामती व त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले होते, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.
मुरूम गावावर शोककळा
रविवारी दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात सेजल आणि अक्षरा यांच्यावर मुरूम गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हा चटका ताजा असतानाच, मंगळवारी रात्री पवनच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण पंचक्रोशी पुन्हा एकदा सुन्न झाली. पवन हा अभ्यासात हुशार आणि अत्यंत लाडका होता.
एकाच क्षणात झालेल्या या भीषण अपघाताने बोडरे कुटुंबाचा संपूर्ण सुखाचा संसार आणि तीन निष्पाप जीवांची स्वप्ने कायमची अधुरी राहिली आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments