पुरंदर रिपोर्टर लाईव्ह
सोमेश्वरनगर | रमेश कदम
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. च्या उपाध्यक्षपदी निंबुत येथील युवा नेते राहुल शामराव काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबई येथील फेडरेशनच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड सर्वानुमते करण्यात आली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनेत्रा पवार तसेच पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार राहुल काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावेळी शासन प्रतिनिधी म्हणून अध्यासी अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबईचे अध्यक्ष शहाजी पाटील उपस्थित होते. तसेच मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित निकम (जळगाव), संचालक जयंत पाटील (रायगड), सुनील चव्हाण (धाराशिव), संदीप नरके (कोल्हापूर), बळवंत पाटील (नांदेड) यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. सर्वांच्या एकमताने राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.
विशेष म्हणजे, यापूर्वी राहुल काकडे यांचे वडील श्याम (काका) काकडे यांनी देखील या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यामुळे काकडे कुटुंबाची सहकार क्षेत्रातील परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत शेतकरी हिताच्या विविध योजना राबविल्या जातात. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तांदूळ व भरडधान्य खरेदी, तसेच नाफेड आणि भारतीय खाद्य निगमाच्या प्रमुख अभिकर्ता संस्थेच्या माध्यमातून कडधान्य व तेलबिया खरेदीचे काम केले जाते. याशिवाय सभासद संस्था आणि अधिकृत वितरकांमार्फत रासायनिक खतांची विक्री देखील करण्यात येते. राज्यभरात फेडरेशनची १२८ गोदामे असून त्यांची साठवणूक क्षमता सुमारे २ लाख ८० हजार ९४० मेट्रिक टन इतकी आहे.
राहुल काकडे यांच्या निवडीमुळे निंबुतसह सोमेश्वर पंचक्रोशीत विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Comments