बारामती | प्रतिनिधी
बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि स्वर्गीय लोकनेते मा. अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३.५ एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. सभागृहातील सर्व सदस्यांनी दादांच्या बारामती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासातील अतुलनीय योगदानाचा गौरव करत हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरावे, अशी भावना व्यक्त केली.
दादांचे स्वप्न स्मारकस्थळी साकारणार
नगराध्यक्ष सचिन सातव यांनी प्रस्तावाची माहिती देताना सांगितले की, याच ठिकाणी एक उंच मनोरा उभारून विकसित झालेली बारामती नागरिकांना पाहता यावी, असा दादांचा मानस होता. मात्र, नियतीच्या क्रूर खेळामुळे आज त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. दादांचे स्वप्न, त्यांची विकासदृष्टी आणि जनतेशी असलेले नाते कायम स्मरणात राहावे, यासाठी हे स्मारक उभारले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्मारकासाठी नगरसेवकांच्या महत्त्वपूर्ण सूचना आणि मागण्या
सभागृहातील चर्चेदरम्यान विविध नगरसेवकांनी स्मारकाच्या स्वरूपाबाबत आपली मते मांडली:
भव्य आणि जागतिक दर्जाचे स्मारक:
नगरसेवक नवनाथ बल्लाळ, अमर धुमाळ, सोमनाथ गजकस आणि गणेश जोजारे यांनी दादांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि कार्याच्या उंचीला साजेसे, दर्जेदार व जागतिक दर्जाचे प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बारामतीसाठी अभिमानाची बाब:
नगरसेवक जय पाटील यांनी दादांप्रती असलेले जनतेचे प्रेम अधोरेखित करत, असे भव्य स्मारक बारामतीत उभारले जाणे ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
प्रवेश पूर्णपणे निःशुल्क असावा
नगरसेवक अमोल कावळे यांनी प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा देत एक महत्त्वाची मागणी केली. दादांनी आयुष्यभर जनतेसाठी आपले दरवाजे खुले ठेवले होते, त्यामुळे स्मारकासाठी येणाऱ्या नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क (Entry Fee) आकारू नये. हे स्मारक सर्वसामान्यांसाठी कायम खुले आणि निःशुल्क ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
आधुनिक तंत्रज्ञान आणि संग्रहालयाची उभारणी
स्मारकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासाचा आणि विविध क्षेत्रातील कार्याचा माहितीपट व चलचित्रांच्या माध्यमातून प्रभावी आढावा सादर केला जाणार आहे. तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण वस्तू, वापरातील साहित्य, छायाचित्रे, दस्तऐवज आणि ऐतिहासिक आठवणींचा संग्रह करून तेथे एक भव्य संग्रहालय उभारण्यात येणार आहे.


0 Comments