वडगाव निंबाळकर येथील शेतकऱ्यांच्या लढ्याला यश. चार किलोमीटर लांबीचा पानंद रस्ता खुला.


पुरंदर रिपोर्टर Live. 

सोमेश्वरनगर। रमेश कदम.   

               डगाव निंबाळकर येथील गेल्या ३० वर्षांपासून बंद असलेला ‘पेरूचा मळा ते मनकराई मुढाळे शिव’ हा पानंद रस्ता अखेर खुला झाला असून, या भागातील शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन संघर्षाला यश मिळाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा व संघर्ष सुरू होता. अखेर प्रशासनाच्या सहकार्याने हा चार किलोमीटर लांबीचा रस्ता मोकळा करण्यात आला.

                सुमारे २५ गटांमधून जाणारा हा शिवरस्ता अतिक्रमण, झाडे व झुडपे यांमुळे पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक, शेतीकामासाठी यंत्रसामग्री ने-आण तसेच दैनंदिन शेती व्यवस्थापनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.



               हा रस्ता पूर्वापार महसूल नकाशामध्ये अस्तित्वात असूनही प्रत्यक्षात वापरासाठी बंद झाला होता. रस्ता खुला झाल्याने शंभर एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस उत्पादक व इतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीमालाच्या वाहतुकीसह शेती व्यवस्थापन अधिक सुलभ होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

                रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार बारामती, उपअधीक्षक भूमी अभिलेख, ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी मोलाचे सहकार्य केले.

               या लढ्यात शिवाजी गायकवाड, बाबुराव गायकवाड, दीपक जाधव, अशोक क्षीरसागर आणि विनायक गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच जागृती ग्राहक राजा संघटनेचे बारामती तालुकाध्यक्ष श्याम खजिनदार, धनंजय नामदेव पवार, संबंधित गटधारक शेतकरी व परिसरातील शेतकऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर तीन दशकांपासूनचा हा प्रश्न मार्गी लागला आहे.

Post a Comment

0 Comments