Baramati । ४१ वर्षांनंतर पुन्हा जुळले ऋणानुबंध; माजी विद्यार्थ्यांकडून ६० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश भेट


पुरंदर रिपोर्टर Live. 

सोमेश्वरनगर । रमेश कदम  

               शाळेच्या आठवणी मनात जपलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ४१ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आपल्या गुरुकुलाचे ऋण फेडण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला. न्यू इंग्लिश स्कूल, वाणेवाडी येथील मार्च १९८४ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील ६० गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना दर्जेदार शालेय गणवेश भेट देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

                मार्च १९८४ च्या विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर आयोजित करण्यात आले होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना शाळेने दिलेल्या संस्कारांची परतफेड करण्याची भावना सर्वांच्या मनात जागृत झाली. त्यातूनच माजी विद्यार्थ्यांनी प्रथम शाळेसाठी भव्य आणि मजबूत स्टेज उभारून दिले. त्यानंतर शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे या हेतूने गणवेश वाटपाचा संकल्प केला.

                या उपक्रमासाठी ग्रुपमध्ये केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वखुशीने आर्थिक योगदान देत निधी उभारला आणि त्यातून ६० विद्यार्थी-विद्यार्थिनींना नवीन गणवेशांचे वाटप करण्यात आले. नव्या गणवेशामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान हा कार्यक्रमाचा खरा पुरस्कार ठरला.



               या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव, पर्यवेक्षक श्री. खरात, श्री. भोसले तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

               यावेळी मार्च १९८४ (दहावी) ग्रुपचे अख्तर सिकीलकर, युवराज शिंदे, रविंद्र शिंदे, बाळकृष्ण भोसले, सुरसिंग जगताप, रमेश बामणे, रविंद्र निंबाळकर, भास्कर फरांदे, निळकंठ जगताप आदी उपस्थित होते.


"शाळेने घडविले... आता शाळेसाठी काहीतरी करण्याची वेळ आमची!"

                या भावनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, माजी विद्यार्थ्यांनी जपलेली शाळेशी असलेली नाळ आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा हा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

0 Comments