बारामती | गुन्हेगारांसाठी धाक तर गरजूंना आधार…! सोमेश्वरचे पोलीस अधिकारी राहुल साबळे यांनी मुलाचा वाढदिवस अनाथ व गरीब विद्यार्थ्यांसोबत साजरा करत जपली माणुसकी..!


मोरगाव | प्रतिनिधी

                             आजच्या काळात वाढदिवस मोठ्या गाजावाजात आणि खर्चिक पद्धतीने साजरे करण्याची प्रथा वाढत असताना करंजे पूल दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस बारामती तालुक्यातील मुर्टी-मोढवे येथील यशवंतराव मोरे-पाटील आश्रमशाळेत साजरा केला. यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. तसेच वही, पेन आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यात आला.



या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. वाढदिवसाचा खरा आनंद हा इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यात असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

राहुल साबळे हे परिसरात गुन्हेगारीविरोधातील कठोर भूमिका, अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाली आहे.



कर्तव्य पार पाडताना समाजाप्रती असलेली बांधिलकीही त्यांनी या उपक्रमातून दाखवून दिली. वाढदिवसाचा अनावश्यक दिखावा टाळून वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांसमवेत आनंद वाटून घेण्याचा त्यांचा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

या प्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

"आनंद साजरा करताना समाजातील गरजू घटकांनाही त्यात सहभागी करून घेतले पाहिजे," हा संदेश राहुल साबळे यांनी आपल्या कृतीतून दिला असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments